पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात २१६ पोलीस शिपाई पदांची भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीला उद्या सोमवार (दि. ३०) पासून सुरुवात होणार आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन, वानवडी, हडपसर पुणे येथे ही मैदानी प्रक्रिया ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत पूर्ण होणार आहे.
शहर पोलीस भरतीचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये २१६ पोलीस शिपाई पदांची भरती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात भरती झालेले उमेदवार नुकतेच कर्तव्यावर रुजू झाले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील भरतीनंतर आयुक्तालयाला आणखी २१६ एवढे मनुष्यबळ मिळेल. सन २०१९ च्या पोलीस भरतीत झालेले गैरप्रकार यावेळी टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.
भूलथापांना बळी पडू नका –
पोलीस भरती पारदर्शक पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस भरती करून देतो, असे आमिष जर कोणी दाखवत असेल तर त्यास उमेदवारांनी बळी पडू नये. असे प्रकार निदर्शनास आल्यास दक्षता अधिकारी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (९५२९६९१९६६), पोलीस सह आयुक्त मनोज लोहिया (७९७७८९०८९७) यांच्याशी संपर्क करून माहिती देण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आहे.
उमेदवारांनी हे लक्षात ठेवा –
उमेदवारांना मिळालेल्या प्रवेशपत्रावरील तारखेस पहाटे पाच वाजण्या पूर्वी भरतीसाठी हजर रहावे. दिलेल्या तारखेस उमेदवार उपस्थित न राहिल्यास त्यांना तारीख बदलून दिली जाणार नाही. तसेच दुसरी संधी दिली जाणार नाही. भरतीसाठी येताना आवेदन अर्जाच्या, आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित, साक्षांकित प्रतीचे दोन सेट सोबत आणावेत. आयकार्ड साईजचे दहा फोटो आणावेत, अशा सूचना पोलीस उपायुक्त (मुख्यालय) स्वप्ना गोरे यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.