विकासकामांवरून पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये उभी फूट

  • महेश लांडगे समर्थकांच्या सहकार्यातून राहुल कलाटेंची जगताप गटावर मात

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत वाकड परिसरातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यावरुन सत्ताधारी भाजपमध्ये उभी फूट पडली. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना आमदार महेश लांडगे गटाने थेट समर्थन दिल्याने आमदार जगताप गटाला सभात्याग करावा लागला. यानंतरही स्थायीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनी मतदानाद्वारे कलाटे यांच्या विषयांना मंजुरी दिल्याने महेश लांडगे गटाकडून आमदार जगताप गटाला “शह’ दिल्याचे मानले जात आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीचा सभा आज (दि. 12) पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष संतोष लोंढे होते. या सभेत 29 जून, 5 ऑगस्ट, 12 ऑगस्ट या तहकूब सभाही पार पाडण्यात आल्या. महापालिकेच्या स्थायी समिती 29 जूनच्या विषय पत्रिकेत ताथवडे येथील जीवननगर कडून मुंबई-बेंगलोरकडे जाणारा 24 मीटर रुंद डीपी रस्ता विकसित करणे, ताथवडेच्या शनिमंदिराकडून मारुंजी गावाकडे जाणारा 30 मीटर रुंद डी.पी.रस्ता विकसित करणे, प्रभाग 25 मधील आवश्‍यकतेनुसार रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, वाकड येथे आरक्षण क्रमांक 23 मध्ये शाळा इमारत बांधणे हे विषय मान्यतेसाठी होते. त्यातील विषय क्रमांक 14 आणि 22 हे विषय दोन आठवडे तहकूब करण्यात आले. तर 15 आणि 16 या विषयावर मतदान घेवून ते विषय मंजूर करण्यात आले. मात्र हे दोन्ही विषय मंजूर करण्यास जगताप गटाच्या पाच स्थायी समिती सदस्यांनी विरोध दर्शविला.

हा विरोध मोडीत काढत सभापती संतोष लोंढे यांनी हा विषय मतदानास टाकला. मतदानाला विषय आल्यानंतर पाच जगताप समर्थक नगरसेवकांनी विरोध दर्शविला. मात्र राष्ट्रवादीच्या शिवसेनेच्या तसेच भाजपातील लांडगे समर्थक नगरसेवकांनी या विषयाला समर्थन देत प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. प्रस्तावाच्या बाजूने 8 तर विरोधात 5 मते पडल्याने हा विषय सभापतींनी मंजूर केला. स्थायी समितीमध्ये पहिल्यांदाच जगताप विरोधकांची एकी पहावयास मिळाली. तर गेल्या तीन वर्षांपासून स्थायी समितीवर एकहाती वर्चस्व राखणाऱ्या जगताप यांना हा शह असल्याचे मानले जात आहे.

कलाटेंच्या माध्यमातून चिंचवडला “लक्ष्य’
भोसरी मतदारसंघासह पिंपरीमधील बहुतांश प्रभागांमधील नगरसेवकांना आपल्या गटात आणण्यात आमदार महेश लांडगे यशस्वी ठरले आहेत. आता राहुल कलाटे यांच्या माध्यमातून चिंचवडमध्येही त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केल्याचे आजच्या प्रकारामुळे मानले जात आहे. आज जगताप समर्थकांचा विरोध मोडीत काढून राहुल कलाटे यांच्या प्रभागात दिलेल्या कामांना मंजुरी म्हणजे काही दिवसांपूर्वी जगताप समर्थकांनी स्थायीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांना अडचणीत आणण्याच्या केलेल्या प्रयत्नाचेही उट्टे काढल्याचे बोलले जात आहे.

या सदस्यांनी केला सभात्याग अन्‌ विरोध
आमदार लक्ष्मण जगताप गटाचे समर्थक स्थायी समिती सदस्य अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, अभिषेक बारणे, संतोष कांबळे, आरती चौंधे यांनी प्रभाग क्रमांक 25 मधील विविध विकास कामांचे विषय फेटाळण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर आमदार लांडगे गटाचे स्थायी सभापती संतोष लोंढे यांनी मतदान घेऊन विषयाला मान्यता दिली. त्यामुळे जगताप समर्थकांनी स्थायीच्या सभेतून सभात्याग करुन विषयाला विरोध दर्शविला.

पहिल्यांदाच नामुष्की
महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी एकहाती वर्चस्व ठेवले होते. जगताप यांच्याच आदेशाने बहुतांश निर्णय घेतले जात होते. मात्र जगताप यांचा विरोध डावलून राहुल कलाटे यांचे विषय मंजूर करणे ही गेल्या साडेतीन वर्षांतील पहिलीच घटना आहे. तर जगताप गटावरही पहिल्यांदाच नामुष्की ओढावल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.