पिंपरी – ऐन कामाच्या वेळेत ग्रेडसेपरेटरमध्ये मेट्रोच्या पिलरच्या रंगरंगोटीची कामे केली जात आहेत. त्यासाठी रस्त्यामध्येच क्रेन उभी केली जात आहे. बॅरिकेटस लावले जात आहेत. परिणामी वाहनांना अडथळे निर्माण होऊन वाहनांची गती कमी होत आहे. वाहनधारकांना कसरत करत वाहने पुढे घेऊन जावे लागत आहे. अनेक वेळा अपघाताच्या शक्यताही निर्माण होत आहेत. वाहनांची रहदारी कमी असताना ही कामे करावीत अशी मागणी वाहनधारक करत आहेत.
पुण्याहून निगडीकडे जाताना वल्लभनगर जवळील ग्रेडसेपरेटरमध्ये मेट्रो प्रशासनाकडून विविध कामे केली जात आहेत. सध्या मेट्रोच्या पिलरच्या रंगरंगोटीची कामे केली जात आहेत. पिंपरी चौकापासून पुढे ही कामे केली जात आहेत. त्यासाठी भर रस्त्यामध्येच क्रेन उभी केली जात आहे. तसेच बॅरिकेडस देखील लावले जात आहेत.
ग्रेडसेपरेटरमधून वेगाने वाहने जातात. त्यांना या क्रेनचा अडथळा निर्माण होत आहे. अचानक वाहने हळू करावी, लागत असल्याने मागील वाहने धडकण्याची शक्यता निर्माण होत आहे. अपघाताच्या शक्यता निर्माण होत आहेत.
सकाळच्या वेळी वाहतूक कोंडीचा सामना करत कामावर जावे लागत आहे. त्यामध्ये ग्रेडसेपरेटरमधील अडथळ्यांची भर पडत आहे. मध्येच वाहने उभी केली जात असल्याने अंदाज येत नाही. किमान वाहने कमी असताना अशी कामे करावीत.
– सूरज चौधरी, नोकरदार.