पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी 171 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे आतापर्यंत शहरातील एकूण करोनाबाधितांचा आकडा 94948 इतका झाला आहे. गुरुवारी उपचारा दरम्यान दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 171 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. शहराबाहेरील एकाही रुग्णाची गेल्या 24 तासांमध्ये नोंद झाली नाही. तसेच आज दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरातील थेरगाव येथील 52 वर्षीय पुरुष व चिंचवड येथील 51 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दिवसभरात 136 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 91609 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2699 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
अद्याप 1359 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 714 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 899 इतकी आहे.