पिंपरी – वाहन ही आज प्रत्येकाची गरज तर आहेच परंतु स्वप्नही असते. पै-पै जमवून दर महिन्याला हप्ता भरुन अनेक जण आपल्या आवडीचे वाहन घेतात. परंतु वाहनचोरांची नजर कायम अशा वाहनांवर असते. नवीन वर्षात देखील वाहनचोरांचा सुळसुळाट कायम असून जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत रोज सरासरी चार याप्रमाणे चोरट्यांनी शहरातील 237 वाहने लंपास केली आहेत. यात सर्वाधिक संख्या दुचाकींची आहे. वाहनचालकाचा थोडा निष्काळजीपणा किंवा क्षुल्लक चुका या चोऱ्यांसाठी कारणीभूत ठरत आहेत. आपले वाहन चोरीलाच जाऊ नये, याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण वाहन चोरीला गेल्यानंतर ते परत मिळण्याचे प्रमाणे अत्यल्प म्हणजे अवघे दहा टक्के आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांतील 59 दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून 237 वाहने चोरीला गेली असून चोरीला गेलेली अवघी 23 वाहने सापडली आहेत. मागील वर्षभरात 1 हजार 590 वाहने चोरीला गेली असून वर्षभरात केवळ 365 वाहने शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे वाहन चोरीला गेल्यानंतर शोधण्यापेक्षा ते चोरीला जाऊच नये म्हणून खबरदारी घेणेच जास्त गरजेचे आहे.
सराईत वाहन चोरटे इतर शहरातून येऊन वाहने चोरून नेत असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये समोर आले आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये वाहनांचे लॉक तोडून वाहने चोरून नेली जातात. काचा फोडून, बनावट चावीच्या सहाय्याने, स्क्रू ड्रायव्हरने दरवाजा उघडून अशा अनेक क्लुप्त्या वापरून हे चोरटे वाहन चोरी करतात. त्यामुळे वाहन कंपन्यांनी डिजिटल लॉकसाठी इंजिन कंट्रोल युनिट किंवा इंजिन कंट्रोल मॉड्युल नावाची प्रणाली विकसित केली. महागड्या वाहनांमध्ये डिजिटल लॉक देण्यात आले आहेत. मात्र चोरट्यांनी अशी वाहने चोरण्याची कसब देखील शिकून घेतली आहे.
अशी लढवितात शक्कल
चोरटे डिजिटल लॉक सिस्टमचे एक युनिट स्वतःकडे बाळगतात. डिजिटल लॉक सिस्टम असलेल्या वाहनांच्या काचा फोडून कार मधील डिजिटल युनिटचे कनेक्शन त्यांच्याकडे असलेल्या सिस्टमला जोडतात. यामुळे वाहन तात्पुरत्या कनेक्शनवर काही किलोमीटर सहज जाऊ शकते. विमा कंपन्यांकडून अपघातग्रस्त वाहने लिलाव पद्धतीने घ्यायची. त्या वाहनांच्या मॉडेलची दुसरी वाहने चोरून चोरलेल्या वाहनांना भंगारात घेतलेल्या वाहनांच्या नंबर प्लेट लावून बनावट कागदपत्रे बनवून त्यांची विक्री करायची, असेही प्रकार घडत आहेत. अशा एका टोळीला गुन्हे शाखेने रावेत मधून अटक केली होती.
पोलीस यंत्रणा ठरतेय कुचकामी
चोरीला गेलेली वाहने शोधण्यात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये 237 वाहने चोरीला गेली आहेत. तर दोन महिन्यात केवळ 23 वाहने पोलिसांना मिळाली आहेत. हे प्रमाण अवघे दहा टक्के एवढे आहे. दररोज सरासरी चार वाहने चोरीला जात आहेत. तर तीन दिवसांना एका वाहनाचा शोध लागत आहेत.
वाहनचालकांच्या क्षुल्लक चुका ठरताहेत कारणीभूत
ही खबरदारी घ्या
स्टेयरिंग लॉक, क्लच लॉक, ब्रेक लॉक अशी उपकरणे वापरा
गाडी पार्क केल्यानंतर लॉक केल्याची खात्री करा
वाहनांना सेन्सर अलार्म बसवा
वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवा
महागड्या वस्तू (पैसे, दागिने, लॅपटॉप, म्युझिक सिस्टीम) वाहनांमध्ये ठेऊ नका
वाहन न चालवता अनेक दिवस एकाच ठिकाणी पार्क करू नका
वाहनाचा नंबर पुढील आणि मागील भागावर कलरने लिहा
वाहनाचा नंबर काचांवर
कोरून घ्या
पुरेसा प्रकाश, सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरा असलेल्या ठिकाणी वाहने पार्क करा
वाहनाचा विमा काढा
दोन महिन्यांत
चोरीला गेलेली वाहने
दुचाकी 213
तीनचाकी 11
चारचाकी 13