पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी कचरा डेपो येथे सुक्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्पात 14 मेगावॅट वीज तयार होत असल्याचा दावा महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केला आहे.
महापालिकेने सुरू केलेला राज्यातील हा पहिला प्रकल्प आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्ट 2023 ला झाले. आयुक्त म्हणाले की, प्रकल्पाचे काम 100 टक्के पूर्ण झाले होते. त्यामुळे पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. महावितरण व महापारेषणसोबत तांत्रिक मुद्दे उपस्थित झाले. त्याचबरोबर हा राज्यातील पहिलाच वीजनिर्मिती प्रकल्प असल्याने काही नवीन मुद्दे उपस्थित झाले.
केंद्र आणि राज्य शासनाचे वीजनिर्मितीचे नियम तपासण्यात आले. त्यात थोडा कालावधी गेला. तसेच, तयार झालेली वीज महापारेषण कंपनीच्या फिडर ग्रीडला जोडावी लागते. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने वीजनिर्मिती सुरू करण्यात आली. ती वाढवत नेऊन 14 मेगा वॅट वीजनिर्मिती केली जात आहे. आता पूर्ण क्षमतेने प्रकल्प सुरू असल्याचे आयुक्त म्हणाले.
चंद्रपूरची जागा घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
मोशीतील कचरा डेपोच्या जागेची क्षमता संपत आली आहे. या ठिकाणी कचऱ्यांचे डोंगर उभारले गेले आहेत. त्यामुळे भविष्यात शहराची कचरा कोंडी होऊ नये, यासाठी पुनावळे येथे कचरा डेपोसाठी आरक्षित केलेली वन विभागाची जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या जागेच्या बदल्यात वन विभागाला जागा द्यावी लागणार आहे. यासाठी पालिकेने चंद्रपूर येथील जागा निश्चित केली असून ही जागा वनविभागाला देण्यासाठी प्रशासकीय प्रक्रियेला गती देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.