पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. महापालिका आयुक्तांनी (बुधवार) आणि आज (गुरुवार) शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. मात्र, हा आदेश मंगळवारी काढणे अपेक्षित असताना बुधवार (दि.13) रोजी दुपारी प्रशासनाने आदेश प्रसिध्द केला. त्यामुळे सकाळी भरणाऱ्या शाळा व्यवस्थापनाला आदेशाची माहिती मिळाली नाही. अनेक शाळा सकाळीच भरल्या होत्या. भर पावसात पालक विद्यार्थ्यांना घेऊन धावत-पळत शाळा गाठत होते. तर काहींना शाळेत आल्यानंतर आज सुट्टी असल्याचे माहिती झाले. महापालिकेच्या अजब कारभारामुळे विद्यार्थी आणि पालकांची मात्र भरपावसात चांगलीच धावपळ झाली.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात वरूणराजा जोरदार बरसत आहे. आणखी एक ते दोन दिवस जोरदार पाऊस कोसळ्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीसह रेड अलर्टही दिला आहे. त्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक तसेच सर्व खासगी शाळा (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित) अशा सर्व शाळांना (बुधवार) आणि आज (गुरुवार) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिले आहेत. मात्र, बुधवारी सुट्टी जाहीर करायची होती तर सुट्टीचा आदेश मंगळवारी काढणे अपेक्षित होते. सुट्टी बुधवारी आणि आदेशही बुधवारी असा अजब कारभाराचा नमुना शहरवासीयांना पाहायला मिळाला.
बुधवारी गुरूपौर्णिमा होती. शहरातील सर्व शाळांमध्ये गुरूपौर्णिमेची जय्यत तयारी करण्यात आली होती. शाळांना पावसामुळे सुट्टी दिल्याचा आदेश बुधवारी दुपारी प्रसिध्द झाला. त्यामुळे सकाळी भरणाऱ्या अनेक शाळा सुरू झाल्या होत्या. शाळेत गुरूपौर्णिमेचे विविध कार्यक्रम सुरू असतानाच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने कार्यक्रम अर्धवट करूनच शाळांना सुट्टी देण्यात आली. लेटलतीफ कारभाराचा विद्यार्थी आणि पालकांना चांगलाच फटका बसला.