पिंपरी : अतिरिक्‍त आयुक्‍त अजित पवार अखेर महापालिकेतून कार्यमुक्‍त

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्‍त आयुक्‍त 2 या पदावर कार्यरत असलेल्या अजित पवार यांना बुधवारी (दि. 7) महापालिका आयुक्‍त राजेश पाटील यांनी कार्यमुक्‍त केले आहे. “स्पर्श’मधील भ्रष्टाचार आणि माजी महापौर योगेश बहल यांनी घेतलेला आक्षेप या कार्यमुक्तीला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सप्टेंबर 2019 पासून अजित पवार हे अतिरिक्‍त आयुक्‍त 2 या पदावर कार्यरत होते. ज्या दिवशी ते महापालिकेत रुजू झाले, त्याच दिवशी त्यांची पुणे जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. या पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांना अतिरिक्‍त आयुक्‍त या पदावरून तात्काळ कार्यमुक्‍त करण्याचे आदेश शासनाचे दिले होते. मात्र शासनाला पाठविलेल्या एका पत्राचा आधार घेऊन ते दीड वर्षे महापालिकेत कार्यरत होते.

या कालावधीत पवार यांनी अत्यंत उत्कृष्ट काम करताना स्पर्श हॉस्पिटलच्या कोविड संदर्भात घेतलेल्या बिलाचा विषय त्यांच्या अंगलट आला. एकही पेशंट नसताना भरपाई म्हणून स्पर्श हॉस्पिटलला पवार यांच्या आदेशावरून 3 कोटी 14 लाख रुपये अदा करण्यात आले होते. यावरून महापालिका पातळीवर चांगलेच राजकारण पेटले होते.

“स्पर्श’मधील भ्रष्टाचार आणि शासनाकडून कायदेशीर नियुक्‍ती नसल्यावरून योगेश बहल यांनी महापालिका आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजाविली होती. यावरूनही बराच गदारोळ निर्माण झाला होता.

आज (बुधवार, दि. 7) रोजी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आजच्या कामाची वेळ संपल्यानंतर महापालिकेच्या कामकाजातून अजित पवार यांना मुक्‍त करण्यात येत असल्याचे आदेश बजाविले आहेत. शासनाने नियमित अथवा अतिरिक्‍त पदभाराबाबत कोणतेच आदेश न दिल्यामुळे आपण कार्यमुक्‍त करत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे योगेश बहल यांनी नोंदविलेले आक्षेप खरे ठरले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.