करोना लसीची लहान मुलांवरील चाचणी स्थगित

लंडन- ब्रिटनमध्ये करोना लसीचा लहान मुलांवर वापर करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. ऑक्‍सफर्डने ही माहिती मंगळवारी दिली असून या लसीच्या डोसनंतर काही लोकांच्या रक्तात गाठी झाल्याच्या शक्‍यतेवर आता संशोधन सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

या बाबत एक निवेदन ऑक्‍सफर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, लहान मुलांवर या लसीचा वापर करण्यात येणार होता. या लसीचा डोस घेतल्यानंतर लोकांच्या रक्तात गाठी होत असल्याच्या बातमीमुळे अनेकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता लहान मुलांवरील करण्यात येणाऱ्या चाचणीला स्थगिती देण्यात आली आहे. ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटर एजन्सीकडून त्यांनी केलेल्या अभ्यासाची अधिक माहिती कंपनीने मागवली आहे.

ब्रिटनमध्ये ऑक्‍सफर्ड-ऍस्ट्राजेनकाची करोनाची लस घेतल्यानंतर चार दिवसापूर्वी सात जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ही लस घेतल्यानंतर 30 जणांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्या आणि त्यापैकी सात जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटर एजन्सीने दिली होती.

जागतिक आरोग्य संघटना, युरोपचे ड्रग रेग्युलेटर आणि ऍस्ट्राजेनका यांनी स्वतः ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पुन्हा-पुन्हा सांगितले होते. रक्ताच्या गुठळ्या किंवा मेंदूतील रक्तस्त्राव होण्याचा धोका या लसीच्या वापरामुळे असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. जागतिक आरोग्य संधटनेने देखील ऍस्ट्राजेनकाला क्‍लीन चिट देत सांगितले होते की, लस आणि रक्ताच्या गुठळ्या याचा कोणताही संबंध असलेली एकही केस आढळली नाही. फ्रान्स, स्पेन, इटली आणि जर्मनीने ऍस्ट्राजेनका लस वापरण्यास मनाई केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.