मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात निलंबित पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझे यांची चौकशी करण्यासाठी “सीबीआय’ने “एनआयए’च्या न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील घराबाहेर स्फोटके असलेली कार ठेवण्याप्रकरणी आणि ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांना 13 मार्च रोजी अटक करण्यात आली आहे.
वाझे यांची चौकशी करण्याची परवानगी मिळावी यासाठी सीबीआयने “एनआयए’च्या विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. वाझे सध्या “एनआयए’च्या कोठडीत आहेत. त्यांना बुधवारी “एनआयए’च्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यावेळीच “एनआयए’ न्यायालयाकडून या संदर्भात सुनावणी केली जाणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाबाबत तपास करण्यासाठी सीबीआयने मंगळवारी रात्री प्राथमिक चौकशीचे प्रकरण दाखल करून घेतले. परमबीर सिंह यांना 17 मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवून गृह रक्षक दलात नियुक्त केले गेले होते. त्यानंतर त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी वाझे यांना आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील हॉटेल आणि बारचालकांकडून दर महिन्याला 100 कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याचे उद्दिष्ट दिले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.