पिंपळे गुरव – पिंपळे गुरवमधील रामनगर, सूर्या अपार्टमेंट, गजानन नगर, मयूरनगरी, ओरियाना सोसायटी, राजीव गांधीनगर, गुलमोहर कॉलनी, कल्पतरू, सृष्टी चौक, सुदर्शननगर, महाराष्ट्र कॉलनी, वैदू वस्ती, जवळकरनगर आदी परिसरात सोमवारी मध्यरात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी सकाळीदेखील विजेचा लपंडाव सुरू होता. तो सायंकाळी सहा वाजतादेखील लाइट ये-जा करत असल्याने पिंपळे गुरव परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.
पिंपळे गुरवमधील बहुतांश भागात विद्युत केबल नादुरुस्त झाल्याने रात्री बारा वाजता वीजपुरवठा खंडित झाला. तो मंगळवारी सकाळी सुरू झाला. परंतु दहा ते अकरा वाजतापर्यंत सातत्याने विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, व्यावसायिक आणि गृहिणी मात्र हैराण झाल्या आहेत.
वीज पुरवठा वारंवार खंडित होण्यामुळे बँकांच्या व्यवहारावर परिणाम झाला. त्याचाही नागरिकांना फटका बसला. येथील दुकानदार व ऑफिसेस असलेल्या व्यावसायिकांनी वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामुळे कामावर परिणाम होत असल्याचे सांगितले. पिंपळे गुरव परिसर स्मार्ट बनत आहे. परंतु महावितरणचा कारभार आणि सोयीसुविधा मात्र कधी स्मार्ट होणार असा प्रश्न येथील नागरिकांना पडत आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांनी येथील प्रश्नाची दखल घेऊन विद्युत केबल नवीन टाकून येथील वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
फोनचा रिसिव्हर ठेवला बाजूला
सांगवी येथे महावितरणचे विभागीय कार्यालय आहे. मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक महावितरण कार्यालयात संपर्क साधून तक्रार सांगत होते. परंतु नागरिकांची सातत्याने येणार्या फोनमुळे रात्रपाळीच्या कर्मचार्यांनी चक्क फोनचा रिसिव्हरच बाजूला काढून ठेवला. नागरिकांना तक्रारीही करता येत नव्हत्या. प्रत्यक्ष कार्यालयात गेल्यावर सातत्याने फोनवर तक्रारी येत असल्याने फोन काढून ठेवल्याचे सांगण्यात आले. याबाबत अधिकार्यांकडूनही व्यवस्थित उत्तरे मिळत नव्हती.
पिंपळे गुरव परिसरात ठिकठिकाणी विद्युत केबल नादुरुस्त झाल्याने रात्री वीजपुरवठा खंडित झाला होता. सध्या महावितरणचे कर्मचारी विद्युत केबल दुरुस्त करण्याचे व जोड देण्याचे काम करत आहेत. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल.
– आर. एम. काळे, सहायक अभियंता, महावितरण.