- आधार दुरुस्तीसाठी नागरिकांची गर्दी
पिंपळे गुरव – केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड अनिवार्य केले आहे. तसेच बॅंक, रेशन कार्ड, पंतप्रधान आवास योजना यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आवश्यक आहे. पूर्वी काढलेल्या बहुतांश आधार कार्डमध्ये पत्ता, नाव, मोबाइल नंबर लिंक करणे, जन्मतारीख आदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी पिंपळे गुरव येथील बस स्थानकासमोरील जुनी महापालिका शाळेत नागरिक गर्दी करत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेसाठी ज्या नागरिकांना घर नाही त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. ते अर्ज भरण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड गरजेचे आहे. परंतु बहुतांश नागरिकांच्या आधार कार्डमध्ये चुका आहेत. त्यामुळे फॉर्म भरताना अडचणी येत आहेत. तसेच “एक देश एक रेशन कार्ड’ ही मोहीम राबविण्यासाठी आधार कार्ड रेशन कार्डला लिंक करणे गरजेचे आहे. त्यासाठी आधारमध्ये असलेल्या नाव, मोबाइल नंबर लिंक करणे, लिंग, जन्मतारीख, पत्ता आदींमध्ये ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी शहरातील महा ई सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र येथे नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
केंद्रवरील अधिकारी नागरिकांना गर्दी करू नका अशा सूचना करत आहेत. परंतु नागरिक ऐकत नसल्याने करोना सारख्या महाभयंकर साथीमध्ये नागरिकांना करोनाची लागण होण्याची शक्यता आहे. पिंपळे गुरव येथील जुनी मनपा शाळेत गेली अनेक महिने महा ऑनलाइन मार्फत आधारकार्ड काढून देण्याचे काम सुरू आहे. येथे दिवसभरात 50 जणांच्या आधार कार्डची कामे केली जातात. परंतु नागरिक प्रशासनाच्या कोणत्याही नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पालन करत नसल्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.