पश्‍चिम बंगालमधील भाजपच्या वाढीस ममता जबाबदार

अधिररंजन चौधरी : जाहीर चर्चेचे दिले आव्हान

कोलकाता – पश्‍चिम बंगालमधील भाजपच्या वाढीस मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच जबाबदार आहेत. त्या भाजपच्या सर्वांत मोठ्या एजंट आहेत, असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अधिररंजन चौधरी यांनी केला.

कॉंग्रेसने बंगालमध्ये भाजपशी हातमिळवणी केली असल्याचा आरोप ममतांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आला. त्याचा समाचार अधिर यांनी घेतला. भाजपच्या वाढीबाबत जाहीर चर्चा करण्याचे आव्हानही त्यांनी ममतांना दिले.

संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयकावर झालेल्या मतदानापासून तृणमूलचे खासदार दूर राहिले. त्या विधेयकाविरोधात मतदान करण्याचा आदेश ममतांनी दिला असता; तर तृणमूलच्या कुठल्या खासदाराची मतदानावेळी अनुपस्थित राहण्याची हिंमत होती का, असा सवाल करत त्यांनी तृणमूलचीच भाजपशी हातमिळवणी झाली असल्याचा पलटवार केला.

भाजपविरोधात देशपातळीवर लढण्यासाठी प्रादेशिक पक्ष ममतांचे नेतृत्व स्वीकारणार नाहीत. भाजपशी लढण्यासाठी कॉंग्रेस हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रादेशिक पक्ष जाणून आहेत, असेही अधिर यांनी म्हटले. पश्‍चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आतापासूनच त्या राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.