टेकऑफ घेतल्यानंतर विमान इंजिनात लागली आग

पायलटच्या प्रसंगावधानामुळे बचावले 241 प्रवाशांचे प्राण

कॉलराडो – अमेरिकेतील डेनवर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळेत विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने आग लागली. मात्र, पायलटच्या प्रसंगावधानामुळे 241 प्रवाशांचे प्राण बचावले गेले.

फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, होनोलुलू येथे जाणार्‍या बोईंग 777 विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर एका इंजिनात बिघाड झाला. त्यानंतर हे विमान पुन्हा विमानतळावर दाखल झाले. इंजिनात बिघाड झाल्यामुळे आग लागली. आग लागल्यामुळे काही भाग कोसळून पडत होते. मात्र, पायलटने काही वेळेतच विमान सुखरूपपणे उतरवले. विमानाचा क्रू आणि प्रवासी सर्व सुखरूप बचावले.

आग लागल्याचा व्हिडिओ एका प्रवाशाने रेकॉर्ड केला.या विमानात 10 क्रू कर्मचार्‍यांसह 231 प्रवासी होते. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळेतच एक जोरदार आवाज ऐकू आला. खिडकी बाहेर पाहिल्यानंतर इंजिन दिसत नसल्याचे लक्षात आले. त्यावेळी विमान एक हजार फूट उंचीवर होते. सुरक्षित लँडिंगनंतर सर्वांना नव्या विमानाने पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले. एफएए, एनटीएसबी आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला असून या घटनेमुळे काही नुकसान झाले आहे का, याची माहिती घेतली जात आहे.

इंजिन फेल झाल्याची माहिती पायलटने नियंत्रण कक्षाला दिली. त्याशिवाय मेडेचा कॉल दिला. त्याच वेळेस विमानाचे काही अवशेष आग लागल्यामुळे जमिनीवर कोसळत होते. हे अवशेष निवासी भागातही पडले. ब्रुमफिल्ड पोलिसांनी याबाबतचे छायाचित्र जारी केले आहे. विमानाचे अवशेष कोसळल्यामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.