धुळे – मे महिना संपण्यासाठी आता काही दिवस उरले असून आतापासूनच अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. आणि अश्यातच पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामीण भागात शेती मशागतीला जोरदार वेग आला आहे.
शेतात नांगरणी करणे, रोटा व्हिटर फिरवणे ईत्यादी प्रकारची मशागती करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहेत. मात्र, धुळ्यातील रामी (ता. शिंदखेडा) रामा वेडू माळी यांच्या मालकीच्या शेतात मशागती दरम्यान एक प्राचीन मुकुट सापडला आहे.
शेतात सापडलेला हा मुकूट पंचधातूचा असून दोन हजार वर्ष जुना असल्याची माहिती समोर आली आहे. दिगंबर माळी यांना शेतात मशागत करताना हा मुकूट जमिनीत दिसला. त्यानंतर हा मुकूट बाहेर काढण्यात आला.
दरम्यान, मुकूट सापडल्यानंतर तात्काळ अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना कळविण्यात आलं. त्यानंतर घटनेची दखल घेत दोंडाईचा येथील जैन बांधवांनी मुकुटाची पाहणी करताच 2000 वर्षापूर्वीचा पंचधातू मुकूट असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या मुकूटचा पंचनामा करून तो पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे.