पुणे – राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ‘एक्स्प्रेस वे’ वरील टोल शुल्कात 18 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून मुंबई-पुणे “एक्सप्रेस वे’, जुना मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवास महागणार आहे.आता या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्त वाहिनीने प्रसारित केले.
राज्यातील सर्वात व्यस्त मार्ग म्हणून मुंबई-पुणे एक्सप्रेसची ओळखला जातो. एमएसआरडीसीकडून ‘एक्सप्रेस वे’ आणि महामार्गावरील टोलनाक्यांच्या दरांमध्ये सहा टक्के दरवाढ करणे अपेक्षित आहे. पण, एक्सप्रेस वे वरील टोल शुल्कात गेल्या वर्षी दरवाढ झाली नसल्यामुळे यंदा एक्सप्रेस वे आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील टोलमध्ये 18 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आता या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
या संदर्भात जनहित याचिका हायकोर्टात प्रलंबित आहेत. यावर आता 5 एप्रिलला सुनावणी होणार आहे. यामुळे आता सर्व वाहन धारकांचे लक्ष या याचिकेकडे लागले आहे. सर्वसामान्यांना दिलासा मिळणार की एक्सप्रेस वे पुन्हा महागणार याबाबत सर्वसामान्यांना उत्सुकता लागली आहे.
येत्या एक एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना प्रवास करताना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. याचा ताण सर्वसामान्यांच्या खिषायवर पडणार आहे.