खाकीतील ओलावा : घरून आणला जेवणाचा डबा, मुलीकडेही सोडले
पुणे – पोटच्या मुलाने आणि सुनेने वाऱ्यावर सोडलेल्या वृद्धेचा दत्तवाडी पोलिसांनी तीन दिवस आईसारखा सांभाळ करून आदर्श निर्माण केला आहे. दिवसेंदिवस नात्याचा ओलावा कमी होत असतानाच पोलिसांनी मात्र माणूसकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचे कौतूक होत आहे.
घरचा पत्ता विसरल्यामुळे सोनाबाई भोसले (65) या तीन दिवसांपूर्वी दांडेकर पुलाजवळ एकट्याच भटकत होत्या. स्थानिकांनी चौकशी केली असता, त्यांना काही सांगता येत नसल्यामुळे दत्तवाडी पोलीस ठाण्यात आणून सोडले. त्यानंतर पोलिसांनी विचारणा केली, तेव्हा त्यांना आपल्या घराचा पत्ता सांगता आला नाही. काही वेळाने त्यांच्याकडून मुलाचा फोन नंबर मिळवला. त्या नंबरवर फोन केला असता तो फोन त्यांच्या सुनेने उचलला. त्यावेळी तिने सासू त्यांच्यासोबत नाही, तर वारजेत राहत असल्याचे सांगून फोन कट केला. एवढेच नाही, तर फोन बंददेखील केला. परंतु, जोरदार पावसामुळे पोलिसांनी वृद्धेला बाहेर न जाऊ देण्याचा निर्णय घेतला.
यानंतर अधिक चौकशी केली असता त्यांची मुलगी भोर येथे राहत असल्याचे वृद्घेने संगितले. मात्र, त्यांना अधिक आठवत नव्हते. प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी त्यांच्या मुलीचा पत्ता शोधून काढला. परंतु, तेथेही जोरदार पावसामुळे स्ता बंद होता. त्यावर पोलिसांनी आजीबाईंना पोलीस ठाण्यात सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी पोलीस कर्मचारी घरून जेवणाचा डबा आणत होते. शुक्रवारी पाऊस कमी झाल्यावर पोलीस उपनिरीक्षक मंगेश साळवी, कॉन्स्टेबल सागर नारगे, प्रज्ञा खोपडे, संध्या काकडे यांनी वृद्धेला मुलगी शैला व जावई मिहान यादव यांच्याकडे खासगी वाहनाने पोहोचवले.
संबंधित वृद्ध महिलेला कोणी जवळचे नातेवाईक नाहीत, म्हणून शासनाच्यावतीने सुरू असलेल्या वृद्धाश्रमात ठेवता आले असते. मात्र, ती सुद्धा माझ्या आईसारखी आई आहे आणि तिला सुद्धा भावना आहेत. तिला तिच्या मायेच्या इतर माणसांपर्यंत पोहचवले पाहिजे, असा विचार करून तिच्या मुलीचा पत्ता शोधून घरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यात सर्व सहकार्यांनीही मदत केली.
– देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तवाडी