हजारो मशिदी हटविल्या, अनेकांना तुरुंगात डांबले
बीजिंग – चीनच्या शिनजियांग प्रांतामध्ये मुस्लिमांचा छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिनजियांग प्रांतातील मुस्लिमांचा आवाज दडपण्यासाठी प्रशासनाकडून मोठी कारस्थाने रचली जात आहेत. शिनजियांगमध्ये सर्रास मानवी हक्कांची पायमल्ली करत आतापर्यंत हजारो मशिदी पाडण्यात आल्या आहेत. तसेच बहुतांश मुस्लीम भाषिकांना तुरुंगात डांबण्यात येत आहे.
याबाबत ऑस्ट्रेलियन थिंक टॅंकचा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटनुसार, जवळपास 16 हजार मशिदी पाडण्यात आल्या आहेत किंवा त्यांचे नुकसान झाले आहे. शेकडो धार्मिक स्थळांच्या उपग्रह फोटोंचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. मागच्या तीन वर्षांत सर्वाधिक पाडकाम करण्यात आले. एका अंदाजानुसार, 8,500 मशिदी पूर्णपणे पाडण्यात आल्या, असे अहवालात म्हटले आहे.
चिनी प्रशासनाने मशिदी पाडल्या असल्या तरी, शिनजियांगमधील अन्य धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांना मात्र हात लावलेला नाही, असे थिंकटॅकच्या पाहणीत समोर आले आहे. मुस्लीम समाजाचे वास्तव्य असणाऱ्या शिनजियांग प्रांतातील अतुश सुंथग या गावातील एक मशीद पाडून तेथे तसेच इतर दोन ठिकाणीही मशिदी पाडण्यात आल्या आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार अतुश सुंथग या गावामध्ये दोन वर्षांपूर्वी एकूण तीन मशिदी होत्या. त्यापैकी तोकुल आणि अजना मशीद पाडण्यात आली आहे. जिनपिंग सरकारने हाती घेतलेल्या सुधारणा कार्यक्रमांतर्गत हे काम करण्यात येत असल्याचे एका वाहिनीने म्हटले आहे.