देहूगाव, (वार्ताहर) – देहू नगरपंचायत हद्दीतील मुख्य मंदिर ते चौदा टाळकरी कमान परिसरात प्रशासनाकडून रस्त्यांच्या दुतर्फा पट्टया मारण्यात येतील. त्या पट्ट्यांपुढे अतिक्रमण करणाऱ्यांवर दोन हजार रुपये दंड आकारण्यात येईल.दंडानंतरही अतिक्रमण झाल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी दिला आहे.
देहू नगरपंचायत हद्दीमध्ये दिवसेंदिवस पदपथांसह रस्त्यांवर अतिक्रमण वाढत आहे. संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंदीर ते चौदा टाळकरी कमान परिसरातील अतिक्रमणधारकांची नगरपंचायत कार्यालयामध्ये मंगळवारी ( दि.५ ) बैठक घेण्यात आली. नगराध्यक्ष पूजा दिवटे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे,,मंदिर परीसरातील व्यापारी, अतिक्रमणधारक उपस्थि होते.
पालखी सोहळा, कार्तिकी यात्रा आणि बीज सोहळा अशा यात्रा काळात मुख्यमंदिर ते वैकुंठगमन भागातच कारवाई केली जाते. धर्मवीर संभाजी चौक, छत्रपती शिवाजी परंडवाल चौक, मुख्य वर्दळीचा रस्ता, डॉ. आंबेडकर नगर ते मुख्यकमान परिसर, देहू आळंदी मार्ग या ठिकाणी अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी नित्याची होत आहे. त्यावरही कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.