पुणे – मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आयआयटी, एनआयटी यासारख्या प्रतिष्ठित संस्थेत शिकले असून, ते उच्चपदस्थ पदावर कार्यरत आहेत. आता त्यात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने एमएचटी-सीईटीत राज्यात प्रथम येत संस्थेचा नावलौकिक वाढविला आहे, अशा शब्दात मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी अनिशचे कौतुक केले.
अनिश जगदाळे हा राज्यात पीसीबी ग्रुपमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्या स्वाती बर्वे, प्रा. रमेश पंडित, अनिशची आई कुंदा जगदाळे व वडील अरविंद जगदाळे उपस्थित होते. आतापर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात महाविद्यालयातील विद्यार्थ्याने घवघवीत यश मिळविल्याने संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे, असेही भाऊसाहेब जाधव यांनी म्हटले.
सत्कारानंतर अनिश म्हणाला, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला असून, न्यूरॉलॉजिस्ट म्हणून काम करण्याची इच्छा आहे. घरात अभ्यासाचे वातावरण, शिक्षकांकडून अनमोल मार्गदर्शक, अभ्यासात सातत्यपणा यामुळे यश मिळाले. सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळतील, एवढा विश्वास होता. मात्र, राज्यात पहिले येईल, असे वाटले नाही. प्राचार्य डॉ. गोल्हार म्हणाले, अभ्यासात शिस्त महत्त्वाची आहे. त्याच दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांणिक विकासासाठी महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन केले जात आहे. त्याचीच प्रचिती म्हणून अनिशने चांगले यश मिळविल्याचा आनंद आहे.
दरम्यान, आई डॉक्टर आणि वडील इंजिनिअर आहेत. योग्य आहार, घरचे जेवण आणि चांगले आरोग्यासाठी घरात अभ्यासपूर्ण वातावरण ठेवण्यासाठी विशेष लक्ष दिल्याची प्रतिक्रिया आई-वडिलांनी दिली. प्रा. रमेश पंडित यांनी सर्वांचे आभार मानले.