PBKS vs DC : 30 डिसेंबर 2022 ची सकाळ भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यंत दुःखद बातमी देऊन गेली होती. भारतीय संघाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचा इयर इंडिंगलाच भीषण अपघात झाला. त्यानंतर ऋषभ मैदानातच दिसला नव्हता.
या अपघातात ऋषभ पंतचा जीव थोडक्यात बचावला. त्याच्या गुडघ्याला एवढी दुखापत झाली होती की, त्यावेळी तो उभा राहू शकेल की नाही हे सांगणेही कठीण होते. पण पंतची इच्छाशक्ती, बीसीसीआय, एनसीए आणि चाहत्यांच्या प्रार्थनांमुळे अशक्यही शक्य झाले आणि तो क्रिकेट विश्वात पुनरागमन करण्यास सज्ज झाला.
आयपीएल 2024 च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) चा सामना पंजाब किंग्ज (PBKS) सोबत होईल. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत ४५४ दिवसांनी मैदानात परतणार आहे. त्याचवेळी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ व्यवस्थापनाच्या नजरा त्याच्यावर असतील.
BCCI ने ऋषभ पंतला इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी यष्टिरक्षक म्हणून खेळण्याची परवानगी दिली. अशा परिस्थितीत जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 मध्ये त्याच्या निवडीचे दरवाजे उघडले आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही पंतने विकेटकीपिंग केल्यास त्याची टी-२० विश्वचषकात निवड होऊ शकते, असे म्हटले आहे.
अशा स्थितीत भारतीय संघाची नजर ऋषभ पंतवर असेल. संघाने जितेश शर्माला यापूर्वीच आजमावले आहे. याशिवाय ध्रुव जुरेल आणि संजू सॅमसनही भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत आहेत. केएल राहुललाही पर्याय आहे, पण त्याच्या फिटनेसची समस्या कायम आहे.