Niteh Rane : जालना अंतरवली सराटीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणास्थळावर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. यावरुन राज्यभरात खळबळ उडाली होती. मात्र या आंदोलानामागे नेमका कोणाचा हात आहे? यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या प्रकरणात मुख्य आरोपी ऋषीकेश बेदरेसह दोन जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता भाजप नेते नितेश राणे यांनी ऋषीकेश बेदरे आणि शरद पवारांचा एक फोटो ट्वीट केला आहे. या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्वीट करत दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? असा सवाल केला आहे.
नितेश राणे ट्वीट –
“दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? पवार साहेब, पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? असा सवाल नितेश राणेंनी केला आहे. नितेश राणेंनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये दगडफेकीतील मुख्य आरोपी हृषीकेश बेदरे, शरद पवार, राजेश टोपे आहे. नितेश राणे म्हणाले, 1 सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर तीन सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?”, असा सवाल नितेश राणे यांनी ट्वीटद्वारे (एक्स) केला आहे.
दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात?
अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली.
पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण… pic.twitter.com/Nti9p7ortQ— nitesh rane (@NiteshNRane) November 26, 2023
अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांचं उपोषण सुरु असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या लाठीचार्जमध्ये अनेक मराठा आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले होते. जालन्यात पोलिसांनीच आमच्यावर हल्ला केला असा आरोप जरांगे पाटील करत आहेत. तर आंदोलकांनीच पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप दुसऱ्या बाजूकडून करण्यात येत आहे. याच प्रकरणात आता ऋषिकेश बेदरेसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बेदरेच्या घरातून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसंही जप्त करण्यात आली आहेत.
कोण आहे ऋषीकेश बेदरे?
ऋषीकेश बेदरे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. बीड जिल्ह्यातलं गेवराई हे त्याचं मूळ गाव आहे. वाळू पट्ट्यात त्याची दहशत असते. बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्याच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत. दरोड्याचा प्रयत्न, जीवे मारण्याचा प्रयत्न, लुटमार, बेकायदा शस्त्र बाळगणे, दंगल करुन कट रचणे, अॅट्रोसिटी, दारु विक्री आणि जुगाचेही गंभीर गुन्हे बेदरेवर दाखल आहेत.