मुंबई – फर्जंद, फत्तेशिकस्तच्या यशस्वी घोडदौडनंतर दिग्पाल लांजेकर आता ‘पावनखिंड’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले होते. त्यासोबत 18 फेब्रुवारी 2022 ला चित्रपटगृहात येणार असल्याचे सांगितले होते.
आता दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याची माहिती त्यांच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत दिली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘उपसून तलवार, कधी झेलून वार, त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार, इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक, सादर आहे ‘पावनखिंड’ चे ट्रेलर! हर हर महादेव’’
दरम्यान,’पावनखिंड’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरने केले असून चित्रपटात छत्रपतींच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर झळकणार आहे. चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पहायला मिळणार आहे. तसेच मराठी कलाकारांचा भलामोठा फौजफाटा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपटाचा अनुभव घेता येणार आहे.