राहू, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील राहू परिसरात भीमा नदीपात्रात सध्या मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव वाढला आहे. राहू गावाला एका बाजूने पूर्णपणे नदीने वळसा घातला आहे. नदीत पुण्याचे मैलामिश्रित पाणी येत असल्यामुळे जलपर्णीची मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडला जात आहे. बेट परिसरात नातेवाईकांकडे आलेले पाहुणे मुक्कामी थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
भीमा नदीपात्रात घाण पाणी व जलपर्णीमुळे डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे डासांची संख्या अनेक पटीने वाढत आहेत. त्यामुळे नागरिक त्रासून गेले आहेत. विशेषतः हा त्रास दिवस मावळल्यानंतर मोठ्या प्रमाणत चालू होतो. इतका भयंकर असतो की व्यक्ती एक मिनिट सुद्धा एका जाग्यावर बसू शकत नाही. इतकी त्यांची संख्या आहे. त्यामुळे आधी जलपर्णीवर उपाय करणे गरजेचे आहे. यामध्ये हा त्रास राहू, खामगाव, दहीटणे, मिरवडी, वाळकी या गावांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे.
सातच्या आत घरात
राहू बेट परिसरातील गावांना “सात च्या आता घरात” या पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे. दिवस मावळतीकडे झुकला की संपून घराच्या दारे, खिडक्या, तावदाने पूर्ण बंद करावी लागत आहेत. अंधार पडल्यावर ही फौज जागी होते. लाखोंच्या संख्येने घरात शिरली तर मग मात्र दया माया दाखवत नाही.
मुक्या जनावरांचे हाल
राहू परिसरात मोठ्या प्रमाणात दुधाचा व्यवसाय आहे. जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु संध्याकाळनंतर या जनावरांना अक्षरशः रात्रभर डान्स करावा लागत आहे. डासांची संख्या खूप असल्यामुळे जनावरांना बसून रवंथच करता येत नाही. शेतकरी यातून दिलासा मिळावा म्हणून रात्रभर शेकोटी करून त्याचा धूर करून जनावरांचे डासांपासून रक्षण करन्याचा प्रयत्न करत असतात.
सकाळी येऊन लवकर गावी जातो
बेट परिसरात डासांच्या त्रासामुळे अनेक जणांनी सांगितले की, पाव्हणे जरी आले तरी ते मुक्कामी न थांबता सातच्या आत घरी जाण्याचा प्रयत्न करतात. कितीही आग्रह केला तरी ते मुक्काम करत नाहीत. इतकी बिकट परिस्थिती या डासांमुळे ओढवली आहे. परंतु स्थानिकांना तर घर प्रपंच सोडून जाता येत नाही. त्यांना याचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहनच करावा लागत आहे.
डासांची संख्या वाढल्याने अजिबात झोप लागत नाही. आमच्या दुभत्या जनावरांचे दूध चाळीस टक्क्यांनी डासांमुळे कमी पडले आहे. प्रशासनाने याकडे लवकर लक्ष द्यावे. – राजेंद्र सोनवणे (पाटील), ग्रामस्थ, राहू.