भरपावसात सिमेंटने दुरुस्त केला रस्ता
पुणे – पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे महापालिका प्रशासनाची दमछाक झालेली असतानाच; आता महापालिकेच्या दारातच पावसाने खड्डे पडल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीच्या समोर असलेल्या चौकातच मोठे खड्डे असल्याचे गुरुवारी निदर्शनास आले. त्या पेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे, भर पावसात सिमेंट आणि खडी वापरून हे रस्ते दुरुस्त करण्यात येत होते. त्यामुळे दुरुस्तीनंतर अवघ्या काही तासांतच पुन्हा खड्डे पडल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या काही दिवसांत शहरात पावसाने मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे झाले असून याप्रकरणी महापालिका प्रशासनास सर्वपक्षीय नगसेवकांनी स्थायी समिती तसेच महापालिकेच्या मुख्यसभेतही धारेवर धरले होते. तसेच 8 दिवसांच्या आत शहर खड्डेमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यानंतर गेल्या आठवड्याभरात पालिकेकडून सुमारे 600 हून अधिक ठिकाणचे खड्डे दुरुस्त करण्यात आले असले तरी, शहरात गेल्या दोन दिवसांत पुन्हा सुरू झालेल्या पावसाने पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. महापालिके समोरील या चौकात महामेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर खडी विखुरलेली असतानाच, आता रस्त्यावर खड्डेही पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आधीच मेट्रोच्या कामाने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असतानाच त्यात आता पुन्हा रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.