कोल्हापूर : सध्या भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरु आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि मोहळचे माजी आमदार राजन पाटील विरुद्ध भाजपचे खासदार धनंजय महाडीक यांच्यात सामना पाहायला मिळत आहे. मात्र या निवडणुकीच्या प्रचारात राजन पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या = वक्तव्यानंतर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, राजन पाटलांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे दुसरे नेते उमेश पाटील यांनी टीका केली आहे.
टाकळी सिकंदर येथील प्रचाराच्या अंतिम सभेत बोलताना राजन पाटील यांनी महाडिकांवर टीका केली. भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी सत्ताधारी धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीवरील टीका केली आहे. या वक्तव्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. खासदार महाडिक यांनी प्रचार करताना राजन पाटील यांच्या मुलांना, ‘बाळांनो असे बोलू नका’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना राजन पाटील यांची जीभ घसरली. ‘आमच्या पोरांना बाळ म्हणतोय, अरे आम्ही पाटील आहोत, पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी एवढी बाळं असतात असे सांगत त्याचा आम्हाला स्वाभिमान असल्याचे राजन पाटील म्हणाले. तसेच आमच्या पोरांना वयाच्या 17 व्या वर्षीच 302, 307 ची कलमं लागली आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हणत राजन पाटील यांनी एक प्रकारे मुलांच्या गुन्हेगारीचं समर्थन केलं आहे.
टाकळी सिकंदर येथील प्रचाराच्या अंतिम सभेत बोलताना राजन पाटील यांनी महाडिकांवर टीका केली. लग्नाआधी आमच्या पोरांना तुझ्या एवढी पोर झाल्याचं सांगत, त्याचा अभिमान असल्याचेही पाटील म्हणाले. त्यामुळं आता राष्ट्रवादी आपल्या या नेत्यावर काय कारवाई करणार? याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राजन पाटील यांच्या या वक्तव्याच्या तीव्र प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.
राजन पाटलांचे वक्तव्य हे महिलांचा अपमान करणारे आहे. स्वत:च्या पोरांना लग्नाअधीच पोरं झाली आहेत, असे सांगणारा असंस्कृत विकृत माणूस भीमा कारखान्याचा नेता म्हणून तुम्हाला चालणार आहे का? असे म्हणत उमेश पाटील यांनी राजन पाटलांचा समाचार घेतला. राजन पाटील यांच्यावर टीका करताना उमेश पाटील यांनी देखील आक्षेपार्ह टिपण्णी केली आहे. राजन पाटील यांच्यासारखा घाणरेडा नेता मोहोळ तालुक्याचा तीन वेळा आमदार झाला. याची आम्हाला लाज वाटत असल्याचे उमेश पाटील म्हणाले. पाटील म्हणून घ्यायची लाज वाटेल असेही उमेश पाटील म्हणाले.