पुणे – नवीन करोनाबाधितांचा आकडा लक्षात घेऊन शहरात विमान तसेच रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची पुन्हा तपासणी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
याबाबत मंगळवारी विमानतळ आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
कुमार म्हणाले, “केंद्रशासनाने शहरात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. शहरात करोनाचा पहिला बाधित सापडल्यानंतर सुरुवातीला विमान तसेच रेल्वे प्रवाशांची तपासणी पूर्ण क्षमतेने केली जात नव्हती. आता दुसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन या दोन्ही ठिकाणी प्रवाशांची तपासणी करण्याची यंत्रणा उभारण्यात येत आहे.
त्यासाठी नियोजन सुरू असून महापालिकेच्या माध्यमातूनच या तपासण्या सुरू केल्या जाणार आहेत. याशिवाय खासगी बसमधून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीबाबतही जिल्हा प्रशासनाशी चर्चा सुरू आहे.’