पुणे(प्रतिनिधी) – बलात्काराच्या गुन्ह्यात जामीन झाल्यानंतर पीडित असलेल्या तरूणीबरोबर विवाह करून नंतर तिला दाखल असलेला बलात्काराचा खटला मागे घेण्यासाठी दबाव टाकणाऱ्या मुळच्या अफगाणिस्तान देशाचा असलेल्या पतीवर समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तो 2015 मध्ये शिक्षणासाठी पुण्यात आला होता. पुण्यात पुलगेट परिसरातील एका कॉलेमध्ये शिक्षण घेत होता. ती पीडितही त्याचा कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. याच दरम्यान 2015 मध्ये दोघांची ओळख होऊन दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. याच दरम्यान त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. परंतु, नंतर त्यांने लग्नाला नकार दिला. त्यानंतर तरूणीने कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या बलात्काराच्या फिर्यादीवरून त्याला 2017 मध्ये अटक झाली होती.
त्याला या प्रकरणात मार्च 2019 मध्ये जामीन मिळाल्यानंतर त्याने तरूणीचे मन वळवून तिच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला. समाजा बदनामी नको या हेतूने तिनेही त्याच्याबरोबर विवाह केला. याचाच फायदा घेत लग्न झाल्यानंतर तो तिला बलात्काराची केस मागे घेण्यासाठी तगादा लावू लागला.
लग्नाच्या एका महिन्याच्या कालावधीतच त्याचा तगादा पाहून तिने त्याला सहा महिने आपण एकत्र निट राहु त्यानंतर केस मागे घेते असे सांगितले. परंतु, दाखल असलेली केस मागे घेण्यासाठी वारंवार विचारणा करून शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागला. याच काराणातून त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत तिला मारहाण देखील केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार सय्यद करत आहेत.