आळंदी – कोविशिल्ड लसीकरणासाठी आधीच नियोजनाचा अभाव आहे. ज्येष्ठ नागरिकांना तेथील कर्मचारी लसीकरणादरम्यान अपमानास्पद वागणूक देत असल्याचे दिसून येत आहे, असा अनागोंदी कारभार सुरू असतानाच आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या निवासी सदनिकेच्या पार्किंगमध्ये बुधवारी (दि. 5) सायंकाळी चिकन आणि मासवाडीच्या पार्टीचे शाही आयोजन झाले. याची शहरात जोरदार चर्चा रंगली.
सात किलो चिकन आणि मासवडीचा फडशा यावेळी कर्मचा-यांना पाडला. पार्टीचे नियोजन कुणी केले हे मात्र कळाले नाही. सायंकाळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर, कर्मचारी, कर्मचाऱ्यांचे नातेवाईकही यामध्ये सामिल असल्याची चर्चा होती. कोविड काळात कर्मचारी शिणले म्हणून पौष्टिक आहार होता असेही समर्थन काहींनी केले. खरे तर गेली महिन्याभरात ग्रामीण रुग्णालयामार्फत केले जाणाऱ्या लसीकरणात वशिलेबाजीने ज्येष्ठ नागरिक त्रस्त होते.
रेमडेसिविर इंजेक्शनही राजकीय व्यक्तींना वाटप केल्याची अजून चर्चेचे चर्वण केले जात आहे. त्यात कर्मचाऱ्यांची अरेरावी सहन करावी लागली. मात्र या चिकन पार्टीच्या चर्चेने आळंदी ग्रामीण रुग्णालयात करोना काळातही पार्टी झोडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
बाहेर पार्टी झाली की पोलीस कारवाई करतात.
इथे मात्र जवळच पोलीस ठाणे असूनही काणाडोळा केला गेला. ग्रामीण रुग्णालयामार्फत रेमडेसिविर इंजेक्शन कुणाकुणाला वाटप केले याची माहिती एका कार्यकर्त्याने विचारली असता त्याच्यावर दबाव टाकून अर्ज माघारी घेण्यासाठी भाग पाडले जात आहे. मात्र, इंजेक्शन वाटपाची माहिती व यादी अद्याप दिली जात नसल्याचे चित्र आहे.
आरोग्य कर्मचारी काम करतात म्हणून एका सामाजिक कार्यकर्त्याने जेवण दिले. गैरसमज नको. मर्यादित कर्मचारी संख्या होती त्या ठिकाणी गर्दी बिलकूल नव्हती.
– डॉ. गणपत जाधव, वैद्यकिय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, आळंदी