चेन्नई – नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्तांतर झाले असून, राज्यातील सरकारची सूत्रे अद्रमुक पक्षाकडून द्रमुक पक्षाकडे गेली. दरम्यान, आज (शुक्रवार) द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Chennai: DMK Chief MK Stalin takes oath as the Chief Minister of Tamil Nadu.
He is being administered the oath by Governor Banwarilal Purohit pic.twitter.com/e8IZT1aNFz
— ANI (@ANI) May 7, 2021
वृत्त संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई येथे राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी स्टालिन यांना शपथ दिली. त्यांच्यासमवेत मंत्रिमंडळातील ३३ मंत्र्यांनीही शपथ घेतली. पक्षाचे नेते दुराई मुरुगन यांनी जलसंपदा मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यावेळी एमके स्टालिन यांनी मुख्यमंत्री पदासमवेत राज्याचे गृहमंत्री म्हणूनदेखील शपथ घेतली आहे.
२ मे रोजी झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये द्रमुकने एआयडीएमकेची सत्ता उलथून टाकली. एमके स्टालिन यांच्या नेतृत्वात असलेल्या द्रमुकला तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात सहाव्या वेळी सत्तेत बसण्याची संधी मिळाली आहे.
दरम्यान, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत द्रमुक पक्षाने येथे कॉंग्रेस व डाव्या पक्षांशी आघाडी केली होती. हा यूपीए आघाडीचा भाग मानला जातो. द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
मात्र, द्रमुक पक्षाला एक्झिट पोलमध्ये जितक्या प्रमाणात बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, तो मात्र प्रत्यक्षात उतरला नाही. द्रमुकला दोन तृतीयांश बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण प्रत्यक्षात द्रमुकला मिळालेले यश माफक स्वरूपाचे आहे.
भारतीय जनता पक्षाने या राज्यात सत्तारूढ अद्रमुक पक्षाशी युती केली होती. पण त्यांना सत्तेवरून पाय उतार व्हावे लागले आहे. भाजपचे या राज्यातील अस्तित्व याही वेळी नगण्यच राहिले. तथापि, अद्रमुक आघाडीने पराभूत होऊनही येथे जी लक्षणीय लढत दिली ती कौतुकास्पद ठरली आहे. जयललितांच्या निधनानंतर हा पक्ष येथे प्रथमच सार्वत्रिक निवडणुकीला सामोरा गेला.