पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेत विविध कामांसाठी नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र, महापालिका इमारतीच्या आवारात असलेली पार्किंग व्यवस्था अपुरी असल्याने कामासाठी येणाऱ्यांना इमारतीच्या बाहेर असलेल्या रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागत आहेत. परिणामी परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येणाऱ्या नागरिकांना किमान पार्किंगची व्यवस्था असण्याची गरज आहे.
महापालिकेत बहुतेक कर्मचारी हे खासगी वाहनांचा वापर करतात. त्यात चारचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. परिणामी त्यांनाच पार्किंग पुरत नाही. कर्मचाऱ्यांसोबतच महापालिकेत कामासाठी येणाऱ्या नागरिकांचीही वाहने पालिकेच्या आउट गेटच्या बाहेर असेलल्या रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागतात. महापालिकेच्या आउट गेटच्या बाहेर नेहरूनगरकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर सर्रास दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळ आउट गेटला कायमच वाहतूक कोंडी होत असते. शिवाय जशी जागा मिळेल तशी वाहने पार्क केली जात असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी खूपच अरुंद होतो. एकावेळी दोन वाहने या रस्त्याने जाणे जिकरीचे ठरते.
माजी नगरसेवक, मान्यवर यांच्या नावाने पार्किंग राखीव ठेवण्यात आले आहे. महापालिकेत येणारे बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांना पार्किंगसाठी जागा मिळते. मात्र, सामान्यांना कधीच पार्किंगसाठी जागा मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
भाजप शहर सचिव मधुकर बच्चे म्हणाले की, पार्किंग सुरक्षारक्षक हे तोंडे बघून पार्किंगसाठी जागा देतात. माजी नगरसेवक, मान्यवर, राखीव पार्किंग त्वरित बंद करावे. शहरातील सर्वसामान्य जनेतेला पार्किंगमध्ये जागा द्यावी, या विषयी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे.