देहूगाव -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 14 जून रोजी तीर्थक्षेत्र देहू दौरा आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. देहू नगरपंचायत प्रशासन व श्री संत तुकाराम महाराज संस्थान यांच्या उपस्थितीत सोमवारी ( दि.23 ) झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव, विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, गटनेते योगेश परंडवाल, नगरसेवक, नगरसेविका, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व नगरपंचायतीचे प्रभारी अभियंता सचिन गायकवाड उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांच्यासाठी हेलिपॅड व सभेसाठी जागेची निवड करणे, प्रमुख रस्ते वगळता अंतर्गत रस्ते बॅरेकेटिंगने बंद करणे. पालखी सोहळ्यासाठी पाणी टॅंकर, सुलभ शौचालय, फिरते शौचालय उभारणे, धूर फवारणी व औषध फवारणी करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय मुख्य मंदिर, वैकूंठ परिसर, स्मशानभूमी, नदीघाट, देहू परिसर स्वच्छ करणे, नदीपात्रातील राडारोडा काढणे, नदीघाटावर कपडे गोधड्या धुण्यास बंदी करण्यासह विविध विषयांवर यावेळी चर्चा करून निर्णय घेण्यात आला.