शिरुर(प्रतिनिधी) : बाबुरावनगर येथील कोरोना बाधित मुलीच्या संपर्कात आलेल्या व वाढदिवस साजरा करणाऱ्या 15 पैकी 14 शाळकरी मुलांचा कोरोना व्हायरस अहवाल निगेटिव्ह आला आहे. बाबुराव नगर मधील या मुलींच्या इमारतीत राहणारा दहा वर्षीय मुलगा या मुलींशी संपर्कात आल्याने त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी दिली.
एकूण 15 पैकी 14 शाळकरी मुलांचा कोरोना व्हायरस अहवाल निगेटिव्ह आला असल्याने शिरूर शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासापासूनही जास्त काळ शिरूर शहरातील प्रत्येक नागरिक या कोरोना अहवालाची प्रतीक्षा करत होता. कारण यातील अनेक मुले शहरातील व्यापाऱ्यांची असल्याने शहरातील नागरिकांनाही याची चिंता होती.
मुलांनी साजरा केलेला वाढदिवस शिरूर शहराच्या अंगलट येतो की काय ? अशी भीती नागरिकांमध्ये होती. शिरूर शहरात कालपासून अफवांना उधाण आले होते. आज शिरूर शहरातील सर्व जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने शिरूर शहरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.
काल शिरूर येथील कोविड सेंटर येथून एकूण 23 जणांचे कोरोना तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी 22 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून केवळ बाबुराव नगर येथील व कोरोना बाधित मुलींच्या संपर्कात आल्याने एक दहा वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये शिरूर शहरातील 15 जणांची व शिरूर तालुक्यातील कुरुळी धामारी सणसवाडी येथील 8 नागरिकांचा समावेश होता. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी शिंदे व पाटील यांनी दिली आहे.