कराड -करोना संक्रमणाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कराड परिसरात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवार, दि. 23 पासून शंभर टक्के लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली आहे. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, यामध्ये दूध पुरवठा बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. नागरिकांमधून झालेल्या प्रचंड मागणीनुसार कराड शहरात शुक्रवार दि. 24 पासून दूध पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी दिली असल्याची माहिती इन्सिडेंट कमांडर तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.
शुक्रवारपासून सकाळी 6 ते 8 व संध्याकाळी 6 ते 8 या दोन्ही वेळेत सर्वांना घरपोच दूध उपलब्ध होणार आहे. कोयना दूध संघ शहरातील प्रमुख वितरकांकडे दूध पोहच करणार आहे. त्यानुसार शुक्रवारी दुपारी सुमारे 8 हजार लीटरचा दूध पुरवठा कोयना दूध संघातर्फे दुपारी चार वाजेपर्यंत कराड शहरातील वितरकांकडे करण्यात आला. वितरकांनी फोनवरून मागणी आलेल्या नागरिकांपर्यंत दूध पोहोच केले.
यापुढे दूध पुरवठा अव्याहतपणे चालू राहणार आहे. इतर मुख्य वितरक यांना घरपोच दूध वितरणासाठी परवानगी दिली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन दिघे यांनी केले आहे. दूध वितरणावर प्रशासनाचे लक्ष आहे. नागरिकांनी दुधाच्या नावाखाली गर्दी केल्यास संबंधित दूध विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
गुरुवार, दि. 23 पासून कराड मलकापूरसह परिसरातल्या तेरा गावात लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये होत आहे. यात रुग्णालय वगळता जीवनावश्यक सेवाही बंद होत्या. दूधपुरवठाही होत नसल्याने नागरिकांची विशेषतः लहान मुलांची गैरसोय होत होती. त्यामुळे दूध पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत होती. जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली व दूध पुरवठा करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी केली होती. याची दखल घेऊन अखेर घरपोच दूध सेवेला परवानगी देण्यात आली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.नागरिकांनी दुधाच्या नावाखाली फिरत बसू नये. घरात बसून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी दिघे यांनी केले आहे.