“शेती विकासासाठी पाणंद रस्ता महत्त्वाचा”

अमरावती,  – शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पोहोचण्यासाठी पाणंद रस्ता आवश्‍यक आहे. ज्याप्रमाणे महामार्ग महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे शेती विकासासाठी पाणंद रस्ता महत्वाचा आहे. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन पाणंद रस्ता ही योजना प्राधान्य क्रमावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेस निधी आणि निर्णय प्रक्रिया गतीने होण्यास मदत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात अचलपूर आणि चांदूरबाजार या तालुक्‍यातील 600 किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. त्यावेळेस ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना वीज, पाणी अत्यंत आवश्‍यक आहे. त्याप्रमाणे शेतामध्ये पोहोचण्यासाठी पाणंद रस्ते महत्त्वाचे आहे. राज्याच्या विकासासाठी ज्याप्रमाणे महामार्ग आवश्‍यक आहेत, त्याप्रमाणे ग्रामीण भागाच्या विकासासाठी पाणंद रस्त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करण्याची क्षमता या पाणंद रस्त्यामध्ये आहे. या रस्त्याचे खडीकरण झाल्यास शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर पोहोचणे सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले.

हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पण सध्याच्या करोनाच्या संकटामुळे यास उशीर होत आहे. करोनाचे संकट हे अधिक आहे. तरीही शेतकऱ्यांच्या विकासासाठी जे काही शक्‍य आहे, त्या कामांना प्राधान्य दिले जाईल. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने विचार केला जाईल, असे ठाकरे म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.