सातारा | सराईत गुंड जिल्ह्यातून एका वर्षाकरिता तडीपार

सातारा (प्रतिनिधी) – मंगळवार पेठेतील बोगदा परिसरातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विजय ऊर्फ पिल्या राजू नलवडे (वय 30, रा. 439 मंगळवार पेठ) याला जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केल्याचा आदेश सातारच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी बुधवारी दिला.

याबाबत माहिती अशी, नलवडे याच्यावर दरोडा, जबरी चोरी, खंडणीखोरी, हत्यारे वापरून दहशत माजवणे, लोकांना गंभीर दुखापत करणे, गर्दी जमवून मारामारी करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे सातारा शहर, शाहपुरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. 

यातील अनेक गुन्ह्यांमध्ये तो सध्या जामिनावर असून त्याच्या वर्तनात काही बदल होत नसल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. या तक्रारींची पडताळणी करून पोलिसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी विजय नलवडे याला एक वर्षाकरीता जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश दिला. 

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी हा तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सपोनि विशाल वायकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी या प्रस्तावाचा वारंवार पाठपुरावा केल्याने ही कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तडीपारीच्या काळात नलवडे हा जिल्ह्यात दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.