भवानीनगर : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहू येथून उद्या (दि. 10) पंढरपूरकडे प्रस्थान होणार असल्याने श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम भवानीनगर परिसरामध्ये वेगाने सुरू करण्यास सुरुवात केली आहे.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी देहू ते पंढरपूर 10 जून रोजी देहू येथून प्रस्थान होणार असल्याने ही पालखी इंदापूर तालुक्यात सणसर या गावी पालखीतळ मुक्कामी (19 जून) येणार असल्याने या ठिकाणी शासनाच्या वतीने पाहणी
केली आहे.
श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सध्या सुरू आहे; परंतु काम पूर्ण होण्यासाठी अजून अवधी लागणार असल्याने पालखी सोहळ्याला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पालखी महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू केले आहे. इंदापूर तालुक्याबरोबरच बारामती तालुक्यातील काटेवाडी, लिमटेक या भागात देखील पालखी महामार्गामध्ये जे काम मुरुमीकरण करण्यात आले होते ते डांबरीकरण केले आहे. यंदा थोडेफार अडचण होणार असली तरी देखील पुढच्या वर्षीपर्यंत हा रस्ता पूर्ण होईल.
इंदापूर तालुक्यामध्ये अजूनही काही ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम ज्या ठिकाणी सुरू आहेत त्या ठिकाणी रस्त्यावर मुरमीकरण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी डांबरीकरण करावे. ज्या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम असेल त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मुरमाचे ढिगारे आहेत ते पसरवून त्यावर रोलिंग करावे त्यामुळे पालखी मुक्कामी असलेल्या ठिकाणी वारकऱ्यांना मुक्कामाची चांगल्या प्रकारे सोय होईल.
– आबासाहेब निंबाळकर, अध्यक्ष इंदापूर तालुका कॉंग्रेस कमिटी