कराची : पाकिस्तान-श्रीलंका दरम्यान सुरू असलेल्या दुस-या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसअखेर पाहुणा श्रीलंकेचा संघ पराभवाच्या छायेत सापडला आहे. दुस-या डावात ४७६ धावांचे विजयी लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची ७ बाद २१२ अशी बिकट अवस्था झाली आहे. सोमवारी लढतीचा शेवट दिवस असून, अजूनही श्रीलंकेला विजयासाठी २६४ धावांची तर पाकिस्तानला विजयासाठी ३ विकेटची आवश्यकता आहे.
Day 4 Stumps: SL 271 and 212/7 (60.1 Ov), need 264 to win. Oshada Fernando scored his maiden test century 102*(175) #PAKvSL pic.twitter.com/8StKfLwiTF
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) December 22, 2019
पाकने चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव उपहारापूर्वी १३१ षटकांत ३ बाद ५५५ वर घोषित केला. दुस-या डावात पाकच्या ४ फलंदाजांनी शानदार शतके ठोकली. सलामीवीर आबिद अलीने २८१ चेंडूत (२१ चौकार व १ षटकार) १७४ धावांची खेळी केली तर शान मसूदने १९८ चेंडूत (७ चौकार व ३ षटकार) १३५ धावांची खेळी केली. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी २७८ धावांची भागिदारी केली. त्यानंतर तिस-या क्रमाकांचा फलंदाज अजहर अलीनेसुध्दा १५७ चेंडूत १३ चौकारासह ११८ धावा केल्या. तर बाबर आझमने १३१ चेंडूत ७ चौकार व १ षटकारासह नाबाद १०० धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून दुस-या डावात लहिरू कुमाराने २ तर लसिथ एम्बुलडेनियाने १ गडी बाद केला.
त्यानंतर विजयासाठी ४७६ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. अवघ्या ९७ धावांत ५ गडी गमावले. दिमुथ करुणारत्ने १६, कुसल मेंडिस ० तर एंजेलो मैथ्यूज १९, दिनेश चंडिमल २ आणि धनंजय डी सिल्वा शून्यावर बाद झाला. त्यानंतर निरोशन डिकवेला आणि ओशदा फर्नांडो यांनी डाव सावरत सहाव्या विकेटसाठी ९७ धावा जोडत संघाची धावसंख्या दोनशेपार नेली. डिकवेला ६५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर दिलरूवान परेराला नसीम शाहने बाद करत लंकेला सातवा धक्का दिला. त्यानंतर पंचानी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. पाककडून नसीम शाहने सर्वाधिक ३ तर शाहीन अफरीदी, मोहम्मद अब्बास, यासिर शाह आणि हारिस सोहैलने प्रत्येकी एक गडी बाद केला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा ओशदा फर्नांडो १०२ धावांवर खेळत होता. आता ओशदा फर्नांडोवरच श्रीलंकेची मदार आहे.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान : पहिला डाव – सर्वबाद १९१ आणि दुसरा डाव- १३१ षटकात ३ बाद ५५५ वर घोषित विरूध्द श्रीलंका : पहिला डाव – सर्वबाद २७१ आणि दुसरा डाव – ६०.१ षटकात ७ बाद २१२( ओशदा फर्नांडो १०२ धावांवर खेळत आहे, नसीम शाह ३-३१).