जम्मू – पाकिस्तानी बाजूकडून भारतीय हद्दीत गोळीबार करण्याचा प्रकार सुरूच असून काल रात्री पाकिस्तान रेंजर्सकडून भारतीय हद्दीत कठुआ जिल्ह्यात गोळीबार करण्यात आला. त्यात भारतीय हद्दीतील एक नागरिक जखमी झाला. या जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये मनयारी भागात पाकिस्तानी हद्दीतून फेकण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन हा प्रकार सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमाराला घडला. त्यानंतर रात्रभर दोन्ही बाजूंकडून ही चकमक सुरू होती.
भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्त्युत्तर दिले. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी हा हल्ला चोखपणे परतवला. तथापि, पाकिस्तानच्या माऱ्यात भारतीय हद्दीतील सीमाभागातील अनेक घरे मात्र उद्ध्वस्त झाली आहेत. घरांचे हे नुकसान पाहून रेखा रानी नावाची महिला बेशुद्ध पडली होती. या तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे या भागातील नागरिकांनी भूमिगत राहून संपूर्ण रात्र जागून काढली.