इस्लामाबाद: जगातील अनेक देशांप्रमाणे पाकिस्तानातही करोना फैलावाने हाहाकार उडवला आहे. अशातच त्या विषाणूच्या संसर्गाने बुधवारी पाकिस्तानमधील महिला आमदार शाहीन रझा (वय 60) यांचा मृत्यू झाला. त्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील विधानसभेच्या सदस्या होत्या. त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षात त्या सक्रिय होत्या.
शाहीन या करोनाच्या बळी ठरलेल्या पाकिस्तानमधील पहिल्या लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत. पाकिस्तानमधील इतर काही नेत्यांनाही करोनाची बाधा झाली. मात्र, उपचारानंतर ते बरे झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानमधील करोनाबाधितांची संख्या 46 हजारांच्या घरात पोहोचली आहे. त्या देशात करोनाने सुमारे 1 हजार बाधितांचा बळी घेतला आहे. पाकिस्तानमधील 13 हजारांहून अधिक बाधित आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत.