इस्लामाबाद – पाकिस्तानच्या लष्कराची बदनामी केल्याबद्दल पाकिस्तानच्या संसदेने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राजकीय कारणास्तव देशाच्या लष्कराची बदनामी केली जात असल्याबद्दल माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा निषेध करण्याचा ठराव पाकिस्तानच्या संसदेमध्ये मंजूर करण्यात आला. इम्रान खान यांनी देशविरोधी आणि देशाच्या लष्कराविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधातील कारवाईसाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, अशी अशी मागणी करणारा ठरावही मंजूर करण्यात आला आहे.
जर देशाच्या सरकारने योग्य निर्णय घेतले नाहीत, तर पाकिस्तानचे तीन तुकडे होतील, असे इम्रान खान गेल्या आठवड्यात म्हणाले होते. पाकिस्तान आपली आण्विक क्षमताही गमावून बसेल, असेही इम्रान खान वृत्तवाहिनीवरील एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते.
बेनझीर भुट्टो यांच्या काळात जी लोकप्रियता होती, तशी जर आता नसेल तर तुम्ही पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही. हे लक्षात घेतले तर तुमची भविष्यातील रणनिती काय असेल ? असा प्रश्नही इम्रान खान यांनी सरकारला विचारला होता.
या सर्व वक्तव्यांवर माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीही कोणीही पाकिस्तानी देशाचे तुकडे करण्याची भाषा करणार नाही. अशा शब्दात इम्रान खान यांच्यावर टीका केली होती.
पाकिस्तानच्या संरक्षण दल कमिटीचे प्रमुख जनरल नदीम राजा यांनीही देशाच्या अण्वस्त्रसज्जतेबाबत प्रश्न उपस्थित करणे अनाठायी आहे आणि अशाप्रकारे विनाकरण बिनबुडाची वक्तव्ये करणे टाळावे, असे म्हटले आहे.