लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात संसदेत दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावेळच्या मतदानात जॉन्सन यांचा पराभव थोडक्यात टळला आहे. हा अविश्वास ठराव जरी थोडक्यात फेटाळला गेला असला तरी त्यांच्या हुजूर पक्षातील 359 सदस्यांपैकी 148 बंडखोर सदस्यांमुळे त्यांच्यावर टांगती तलवार यापुढेही कायम राहणार आहे, हे निश्चित झाले आहे.
आज झालेल्या अविश्वास ठरावावरील मतदानाच्यावेळी जॉन्सन यांच्याबाजूने 211 तर त्यांच्याविरोधात 148 मते पडली, असे पार्टी कमिटीचे चेअरमन ग्राहम ब्रॅडी यांनी म्हटले आहे. “पार्टीगेट’ प्रकरणावरून विरोधकांनी आणि त्यांच्या पक्षातील काही सदस्यांनीही जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
करोनाच्या निर्बंधांच्या काळात जॉन्सन यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीसंदर्भात चौकशी समितीने जॉन्सन यांच्यावर ठपका ठेवल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. जॉन्सन यांनी आपल्याच सरकारचेच नियम मोडले, अशी टीका विरोधक करत आहेत.
अविश्वास ठराव फेटाळला गेल्यामुळे जॉन्सन यांना दिलासा मिळाला असला, तरी त्यांच्याच पक्षातील 148 सदस्य त्यांच्याविरोधात उभे राहिल्यामुळे यापुढच्या काळात जॉन्सन यांचा प्रवास अधिकच खडतर असणार हे निश्चित आहे.