इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या चिनी नागरिकांना पाकिस्तानकडून नुकसान भरपाई दिली जाणार आहे. खैबर पख्तुन्वा प्रांतातल्या जलविद्युत प्रकल्पावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या 36 चिनी नागरिकांना पाकिस्तानकडून 11.6 दशलक्ष डॉलरची भरपाई दिली जाणार आहे. आपल्या नेहमीच्या मित्र देशाला शांत करण्यासाठी पाकिस्तानकडून सद्भावनेपोटी ही भरपाई दिली जाणार आहे.
पाकिस्तानचे अर्थ मंत्री शौकत तरीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक समन्वय समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. शौकत तरीन हे करोनाग्रस्त असल्यामुळे दूरदृश्य पद्धतीने या बैठकीत सहभागी झाले होते.
पाकिस्तान आणि चीनमधील सलोख्याचे संबंध जपण्यासाठी सरकारी पातळीवर ही भरपाई दिली जाणार आहे, असे पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गेल्या वर्षी 13 जुलै रोजी खैबर पख्तुन्वा प्रांतातील दासू जलविद्युत प्रकल्पावरील कामगारांना घेऊन जात असलेल्या बसवर झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यामध्ये 10 चिनी ठार झाले होते. यामध्ये बहुतेक इंजिनिअर होते. या हल्ल्यात अन्य 26 जण गंभीर जखमी झाले होते. 4,320 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पाचे काम चीनच्या गेंहुबा कंपनीकडून केले जात आहे. हा प्रकल्पा चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा भाग नाही.