वॉशिंग्टन – पाकिस्तानने आपली आण्विक क्षमता वाढवण्याचे प्रयत्न हाती घ्यायचे ठरवले आहे अशी माहिती पेंटॅगॉनच्या गुप्तचर सूत्रांनी अमेरिकेच्या संसद सदस्यांना दिली आहे. अमेरिकन संसदेच्या सशस्त्र सेना समितीच्या सदस्यांपुढे संरक्षण विभागाच्या गुप्तचर एजन्सीचे संचालक लेफ्टनंट जनरल स्कॉट बेरियर यांनी नुकतीच ही माहिती दिली.
भारताबरोबरचे पाकिस्तानचे संबंध सुधारण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर भारताच्या अण्विक शक्तीचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानने हा कार्यक्रम हाती घेण्याचा मनसुबा रचला आहे असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी अण्विक शक्ती वाढवणे हा एक महत्वाचा मुद्दा असल्याची पाकिस्तानची धारणा झाली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
2022 मध्ये पाकिस्तान नवीन प्रणाली विकसित करून आपल्या आण्विक क्षमतांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करत राहण्याची शक्यता आहे, असे बेरियर यांनी म्हटले आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये काश्मीरात पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे चाळीस जवान मारले गेले आहेत, तेव्हा पासून दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले असून त्यात नंतरच्या काळात भरच पडत गेली आहे.
भारताने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरचे विशेष अधिकार काढून घेण्याची आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याची घोषणा केली.त्यामुळेही पाकिस्तान संतप्त झाला आहे. दोन्ही देशांमधील चर्चेची प्रकिया सध्या खंडीत झाली आहे या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हा कार्यक्रम हाती घ्यायचे ठरवले आहे असे अमेरिकन गुप्तचरांचे म्हणणे आहे.