वॉशिंग्टन – काही दिवसांपूर्वी अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराची आणखी एक घटना घडल्याने देशातील वाढत्या गन कल्चरबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दोन हजार पासून गेल्या वीस वर्षांच्या कालावधीमध्ये अमेरिकेत अशा प्रकारच्या अंदाधुंद गोळीबाराच्या तब्बल 345 घटना घडल्या असून त्यामध्ये एक हजारपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे.
देशातील सामान्य नागरिकसुद्धा आपल्या रागाला वाट मोकळी करून देण्यासाठी बंदुकीचा सहारा घेत आहे असे मत आता समाजशास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. 2008 या वर्षाच्या तुलनेने विचार करता 2022 मध्ये अमेरिकेतील अशा प्रकारच्या गोळीबाराच्या घटनामध्ये तब्बल दोनशे पंचवीस टक्के वाढ झाली आहे.
वंशवाद आणि वर्णवादातून निर्माण होणाऱ्या तिरस्कारमधूनच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. कॅलिफोर्नियातील चर्चमध्ये एका अमेरिकन युवकाने गोळीबार करून दहा कृष्णवर्णीयांची हत्या केल्याची घटना ही या मालिकेतील सर्वात ताजी घटना मानण्यात येते.
आकडेवारी प्रमाणे 1967 ते 2017 या कालावधीमध्ये अमेरिकेमध्ये जेवढ्या गोळीबाराच्या घटना घडल्या आणि त्यामध्ये जेवढे बळी गेले तेवढे बळी अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धमध्येही गेले नव्हते. देशातील सर्वसामान्य नागरिकालाही आता बंदूक व इतर घातक हत्यारे बाळगण्याची इच्छा होऊ लागली आहे. जागतिक आकडेवारी पाहता अमेरिकेतील 89 टक्के लोकांकडे अशा प्रकारची शस्त्रे आढळतात. इतर देशांमध्ये हे प्रमाण पन्नास टक्क्यांच्या आसपास आहे.
येमेन या देशामध्ये शंभर पैकी पंचावन्न लोकांकडे बंदुका असतात. स्वित्झर्लंड सायप्रस आणि आणि फिनलंड या देशांमधील नागरिकांकडे हे प्रमाण अनुक्रमे 45, 46 आणि 35 टक्के आहे. वर्णभेद आणि वंशभेद यातून निर्माण होणाऱ्या रागावर उतारा म्हणून अमेरिकेतील नागरिक आता बंदुकीचा आणि हिंसाचाराचा सहारा घेत आहेत. ही अमेरिकेतील समाज शास्त्रज्ञांना चिंतेची बाब वाटत आहे.