Pakistan General Election : पाकिस्तानमध्ये पुढील वर्षीच्या म्हणजेच 8 फेब्रुवारी 2024 रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत पहिल्यांदाच खैबर पख्तूनख्वामधील बुनेर जिल्ह्यातील सर्वसाधारण जागेसाठी एका हिंदू महिलेने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, बुनेर जिल्ह्यातील PK-25 च्या सर्वसाधारण जागेसाठी सवेरा प्रकाश नावाच्या एका हिंदू महिलेने अधिकृतपणे उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
हिंदू समाजातील सवेरा प्रकाश आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) तिकिटावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. सवेरा प्रकाश यांच्या वडिलांचे नाव ओमप्रकाश असून ते निवृत्त डॉक्टर आहेत. ते यापूर्वी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सदस्यही होते.
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या रिपोर्टनुसार, सोमवारी सलीम खान, खैबर पख्तूनख्वाचे स्थानिक नेते, जो कौमी वतन पार्टीशी संबंधित आहे. ते म्हणाले की, बुनेरमधून आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्या सवेरा प्रकाश या पहिल्या महिला आहेत. सवेरा प्रकाशने 2022 मध्ये अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. त्या पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) महिला विंगच्या सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.
सवेरा प्रकाश यांनी महिला विंगच्या सरचिटणीस म्हणून काम करताना समाजाच्या कल्याणासाठी आपली बांधिलकी दाखवली आहे. त्यांनी महिलांच्या भल्यासाठी काम केले आहे. याशिवाय पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचे कामही करण्यात आले आहे. त्यांनी विकास क्षेत्रातील महिलांच्या ऐतिहासिक दुर्लक्ष आणि अत्याचारावरही भर दिला आणि निवडून आल्यास या समस्यांचे निराकरण करण्याचे त्यांचे ध्येय आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सवेरा प्रकाशने सांगितले की, ती तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून परिसरातील वंचितांसाठी काम करेल. त्यांनी 23 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज सादर केला आणि पीपीपीचे वरिष्ठ नेतृत्व त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देईल अशी आशा व्यक्त केली. वैद्यकीय कुटुंबातील सवेरा प्रकाश म्हणाल्या की, मानवतेची सेवा करणे माझ्या रक्तात आहे.
वैद्यकीय शिक्षण घेत असताना आमदार होण्याचे सवेराचे स्वप्न होते. तिला सरकारी रुग्णालयातील खराब व्यवस्थापन आणि असहायता दूर करायची आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या (ECP) अलीकडील सुधारणांमध्ये सर्वसाधारण जागांवर पाच टक्के महिला उमेदवारांचा समावेश करणे बंधनकारक आहे.