लाहोर : रक्तातील प्लेटलेटचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना कारागृहातून रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
शरीफ (वय 69) यांच्या प्लेटलेटचे प्रमाण 2,000 इतके कमी झाले आहे. त्यामुळे त्यांना लष्करी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. शरीफ यांचे व्यक्तीगत डॉक्टर अदनान खान यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. माजी पंतप्रधान शरीफ यांची प्रकृती चिंताजनक आहे. आरोग्य आणि आयुष्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. प्लेटलेटसचे अत्यल्प प्रमाण, हृदयविकाराचा झटका याला तोंड देताना त्यांच्या किडनीचे कार्यही मंदावले आहे. रक्तातील साखरेचे किरकोळ प्रमाण आणि रक्तदाबाचे नियंत्रण याही आव्हानांना ते तोंड देत आहेत, असे ट्विट त्यांनी केले आहे.
तीन वेळा पंतप्रधानपद भुषवलेल्या शरीफ यांना अजिनाचा त्रास झाला होता. हृदयाला रक्त पुरवठा कमी झाल्याने होणाऱ्या छातीतील वेदना असे या आजाराचे स्वरूप असते. शरीफ यांच्या आजारपणाचे नेमके निदान आणि उपचार ही दोनही आव्हानात्मक आहेत, असे शरीफ मेडिकल सेंटरच्या प्रमुखांनी सांगितले. रविावारी एका दिवसात प्लेटलेटस्ची संख्या 45 हजारवरून 25 हजार इतकी खाली आली. रूग्णालयात दाखल केल्यापासून त्यांचे वजन सात किलोंनी कमी झाले आहे.
चौधरी साखर करखान्याच्या प्रकरणात त्यांची राष्ट्रीय उत्तरदायित्व संस्थेकडून चौकशी सुरू असून त्यांना कोत लखपत येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे. अल अझीझीया स्टिल मिल्सच्या प्रकरणात त्यांना सात वर्ष कारावासाची शिक्षा झाली आहे.