इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. शरीफ यांनी पाकिस्तानी लष्करात बंड घडवण्याचा कट रचला असल्याचा आरोप इम्रान यांनी केला. त्याशिवाय, शरीफ यांचा उल्लेख कोल्हा म्हणून केला.
पाकिस्तानातील एकवटलेल्या विरोधकांनी इम्रान आणि त्यांच्या सरकारविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. सर्व आघाड्यांवर सरकारला अपयश आल्याचा ठपका ठेवत विरोधक इम्रान यांना घेरण्यासाठी सरसावले आहेत. इम्रान यांच्या सरकारला सत्तेवरून हटवण्याचा निर्धार व्यक्त करत विरोधी पक्षांनी एक आघाडी स्थापन केली आहे. त्या आघाडीत सहभागी असणाऱ्या विरोधी पक्षांची संयुक्त सभा मागील महिन्यात झाली.
काही महिन्यांपासून उपचारासाठी लंडनमध्ये असलेल्या शरीफ यांनी त्या सभेत व्हर्च्युअल भाषण केले. त्यावेळी त्यांनी प्रथमच पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय ही गुप्तचर संस्था राजकारणात हस्तक्षेप करत असल्याचा थेट आरोप केला. पाकिस्तानात 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत इम्रान यांच्या विजयासाठी लष्कर आणि आयएसआयने ढवळाढवळ केली, असा दावा करत शरीफ यांनी लष्कर आणि आयएसआयच्या नेतृत्वात बदलाची मागणी केली.
त्याचा संदर्भ देऊन इम्रान यांनी एका सभेत शरीफ यांच्यावर पलटवार केला. आजारपणाचे सोंग करून शरीफ देशाबाहेर पळून गेले. तो ढोंगी कोल्हा लंडनमध्ये बसून पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयवर आरोप करत आहे. पैशांचे पुजारी असणाऱ्या शरीफ यांनी देशाला लुटून प्रचंड संपत्ती जमवली. पाकिस्तानी जनता कधीच भ्रष्ट राजकारण्यांचे लष्करावरील आरोप सहन करणार नाही, असे त्यांनी म्हटले.