पेशावर – पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरच्या सैनिकांकडून पुन्हा गोळीबार झाल्यावर पाकिस्तानने मोक्याच्या ठिकाणी सीमा बंद केली आहे. बुधवारी हा गोळीबार झाल्यावर सीमाभागात तणाव निर्माण झाल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
या गोळीबारात दोन्ही बाजूंकडील कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. हा गोळीबार नक्की कोणत्या कारणामुळे झाला यामागील कारण देखील समजू शकले नाही, असे पाकिस्तानमधील खैबर पख्तुन्वा प्रांतातील तोरखाम भागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान सरकार आणि अधिकारी अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सीमेवर दोन्ही बाजूंकडून गोळीबार झाल्याच्या वृत्ताला अफगाणिस्तानमधील तालिबानी प्रशासनाच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे.
सीमा बंद केल्यामुळे पाकिस्तानमधून अफगाणिस्तानमध्ये निर्यात होणाऱ्या फळे, भाज्या आदी नाशवंत वस्तूंचा पुरवठा करणारे शेकडो ट्रक अडकून पडले आहेत.
दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वरउल हक काकर यांनी “अमेरिकेने परत जाताना सोडून दिलेली शस्त्रे आणि लष्करी उपकरणे आता अफगाणिस्तानमधील पाकिस्तानी तालिबान्यांच्या हाती पडली आहेत.’ असे वक्तव्य केले होते.
अफगाणिस्तानमधील तालिबानशी संबंधित असलेल्या पाकिस्तान तालिबान या गटाने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून पाकिस्तानमध्ये मोठे घातपाती हल्ले घडवून आणायला सुरुवात केली आहे.