लाहोर :- चर्चवर झालेल्या हल्ल्यांप्रकरणी पाकिस्तानमध्ये 100 पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आले आहे. काल कट्टरवाद्यांच्या जमावाने पंजाब प्रांतातील सुमारे 21 चर्चवर हल्ले केले आणि तोडफोड आणि जाळपोळ केली होती. इशनिंदेच्या आरोपांवरून करण्यात आलेल्या या दंगलीची सरकारने दखल घेतली असून उच्चस्तरिय पातळीवरील चौकशीचे आदेश दिले आहेत.
पंजाब प्रांताची राजधानी लाहोरपासून 130 किलोमीटर अंतरावरजर फैसलाबाद जिल्ह्यातील नवाला तेहसीलमध्ये चर्चबरोबर ख्रिश्चन समुदायाच्या नागरिकांच्या घरांनाही लक्ष करण्यात आले होते. अनेक घरांना आगी लावल्या गेल्या होत्या. दोन ख्रिश्चन व्यक्तींनी इस्लामी धर्मग्रंथाची विटंबना केल्याच्या आरोपावरून हा हिंसाचार केला गेला होता.
तहरीक-ए-लब्बेक पाकिस्तान (टीएलपी) या अतिरेकी गटाच्या कार्यकर्त्यांसह 100 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर 600 संशयितांविरुद्ध दहशतवाद आणि ईशनिंदेच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पंजाबचे काळजीवाहू माहिती मंत्री अमीर मीर यांनी गुरुवारी एका निवेदनात सांगितले.
या परिसरामध्ये आता शांतता असून चर्च आणि ख्रिश्चन समुदायाच्या घरांजवळ पोलीस आणि रेंजरचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक इमारतींना लक्ष्य करण्याचा कट्टरवाद्यांचा प्रयत्न पोलिसांनी निष्फळ ठरवला आहे, असेही मीर यांनी सांगितले.
या परिसरामध्ये जिल्हा प्रसासनाने 7 दिवसांसाठी जमावबंदी लागू केली आहे. जरनवालामध्ये सर्व शैक्षणिक संस्था, बाजारपेठा आणि सार्वजनिक वाहतूक आज बंद होती. ख्रिश्चन समुदायाच्या नेत्यांनी चर्चच्या नुकसानींचा आढावा आज घेतला.